चिपळूण बाजारपेठेत थकबाकीदारांशी मुख्याधिकाऱ्यांचा संवाद

चिपळूण : सध्या सर्वच शासकीय कार्यालयात मार्चअखेरची लगीनघाई सुरू आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. यामुळे चिपळूण पालिकेनेही मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे रविवार सुटीचा दिवस असूनही मुख्याधिकारी विशाल भोसले व अधिकाऱ्यांनी चिपळूण बाजारपेठेत थकबाकीदारांच्या भेटीगाठी घेतल्या याशिवाय रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे.

पालिकेला मालमत्ता व पाणीपट्टी करातून यावर्षी थकीत व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, सहायक कर अधिकारी सुशांत मोहिते, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नळ कनेक्शन तोडण्यासह मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कारवाई अंतर्गत २७ मालमत्तांना सील केल्या असून, ६०हून अधिक जणांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. राष्ट्रीय लोकअदालतीतही ५१ प्रकरणे ठेवण्यात आली होती; मात्र त्याला मालमत्ताधारकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांच्या मालमत्ताही सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्यास कालावधी शिल्लक आहे. शासनाकडुन मालमत्ता कर व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्यासाठी तगादा सुरू आहे. यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. वसुली पथकाकडून वसुलीसाठी जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणाजे मुख्याधिकारी भोसले यांनी रविवारी सुटी असूनही शहरात वसुली पथकासह मालमत्ताधारकांच्या भेटी घेतल्या. कर भरण्याच्या त्यांना सूचना केल्या. याबरोबरच या टीमने शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या केवळ आठवडाभराचा कालावधी विक्रेत्यांवरही कारवाई केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 25/Mar/2025