राजापूर : तळवडे येथील श्री नवलादेवीची खुणा शोधण्याचा २६ मार्चला कार्यक्रम

पाचल : कोकणात शिमगोत्सवानंतर खुणा घालण्याची प्रथा रूढ आहे. विशिष्ट ठिकाणी लपवण्यात आलेली खुणा ग्रामदैवतेची पालखी शोधून काढते. राजापूर तालुक्यातील जागृत व सर्वाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री नवलादेवीच्या पालखीचा खुणा शोधण्याचा कार्यक्रम २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता तळवडे येथे होणार आहे. ही अनोखी प्रथा हजारो भाविकांना अनुभवता येणार आहे.

खुणेच्या आदल्या रात्री गावातील मानकरी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्याठिकाणी खडडा खणून त्यात नारळ आणि फुले लपवतात. यावेळी खुणा ठेवणारे मानकरी मंडळी खुणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवतात. त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खुणा बिनचुक शोधून काढते.

ग्रामदेवतेप्रति दृढ श्रध्दा असणारी ही प्रथा गावात अनेक वर्षापासून सुरू आहे. ही खणेची प्रथा पाहाण्यासाठी परिसरातील भाविकांची तुफान गर्दी होत असते. तरी दैवी शक्तीचा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मानकरी व ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 25/Mar/2025