राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथील १०० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी मिळाली आहे. आता सुमारे पाच एकर जागेमध्ये इमारतीसाठी १०० कोटींचा नवा प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात याची तरतूद केली जाणार आहे. यामुळे राजापूर, लांजा तालुक्यांसह सिंधुदुर्गातील आजूबाजूच्या तालुक्यांतील रुग्णांना ते सोयीचे होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी याला दुजोरा दिला.
शासनाच्या आरोग्य संचालकांना त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वाटूळ येथील या १०० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा प्रस्ताव त्यांनी अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याला मंजुरी देण्यात आली आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला लागणाऱ्या आकृतिबंधानुसार उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या, अतिरिक्त निर्माण कराव्या लागणाऱ्या ११६ पदांची निर्मिती केली जाणार आहे. निर्माण होणाऱ्या पदांवर येणारा मासिक व वार्षिक खर्च ४ कोटी २५ लाख १७ हजार २०० एवढा अपेक्षित आहे. या हॉस्पिटलसाठी प्रस्तावित होणारी लोकसंख्या लांजा तालुक्याची १ लाख ३६ हजार ९४२, संगमेश्वर तालुक्याची १ लाख ९८ हजार ३४३ एवढी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ला लागून हे रुग्णालय होणार आहे.
जिल्हा रुग्णालयावरील ताण होणार कमी
राजापूर तालुका हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची हद्द आहे. वाटूळ येथे हे हॉस्पिटल होणार असल्याने याचा दोन्ही जिल्ह्यांना फायदा होणार आहे. साथीचे आजार, अपघात आदीमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ठेवण्यासाठी खाटा शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे हे हॉस्पिटल झाले तर जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. तसेच या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांमुळे चांगले उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 25/Mar/2025














