देवरुख : विनापरवाना एक झाड तोडल्यास पन्नास हजार दंड अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासनाने जाहीर केलेला निर्णय हा जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडणारा आहे, असे मत लाकूड व्यापारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पालांडे यांनी व्यक्त केले. याविरोधात ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील शेतकरी मराठा भवन येथे एकत्र जमा होऊन त्यानंतर शासन निर्णयविरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाने धडकणार आहेत.
शासनाने घेतलेल्या दंडाच्या निर्णयाबाबत जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये ९९ टक्के इतके मालकी क्षेत्र आहे. शासकीय वनक्षेत्र नगण्य आहे. मूल जन्माला आल्यापासून अंत्यविधीपर्यंत विविध कारणांमुळे शेतकरी हा स्वमालकीच्या जमिनीतील झाडेमाडे तोडून आपल्या गरजांची पूर्तता करीत असतो. नवीन पर्यायी वृक्ष लागवड, आजारपण, मुलांचे शिक्षण आणि अंतिम संस्कार, घर दुरूस्ती, फर्निचर तयार करणे यासाठी शेतकरी वृक्षतोड करीत असतो. तोड केलेल्या वृक्षांची बाजार किंमत हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असताना दंड मात्र अवाजवी केला जाणार आहे. शेतकरी वर्गाच्या मालाला हमी न देणारे राज्य शासन दंडाची गॅरंटी मात्र देत आहे. शासनाच्या ५० हजार दंडाच्या निर्णयाबाबत जिल्ह्यातील शेतकरी लाकूड व्यापारी वर्गामध्ये तीव्र विरोध केला जात आहे. शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी ७ रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, असे पालांडे यांनी सांगितले.
पन्नास हजार रुपये दंडाबरोबर जिल्ह्यातील ३११ गावांचा समावेश इकोसेनसेटिव्ह क्षेत्रात समावेश करण्यात आली आहेत. या बाबत सुध्दा गावातून विरोध केला जात आहे.
दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील शेतकरी मराठा भवन रत्नागिरी येथे एकत्र जमा होतील. त्यानंतर शासन निर्णय विरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोचनि धडकतील आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून विरोध व्यक्त करतील, असे पालांडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 07/Oct/2024