Ratnagiri : ‘जिंदल कंपनी’ उतरवणार सातशेहून अधिक विद्यार्थ्यांचा विमा

रत्नागिरी : जिंदल पोर्ट विभागात झालेल्या वायुगळतीमुळे चार महिन्यापूर्वी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. यात ८९हून अधिक विद्यार्थ्यांना वायु बाधा झाली होती. त्यामुळे आता जिंदल परिसरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या सातशेहून अधिक विद्यार्थ्यांचा विमा उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

जिंदल पोर्ट परिसरात झालेल्या गॅस गळतीमुळे वायुबाधा होऊन ८९हून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांना त्रास झाला होता. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात व त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

या बाधित विद्यार्थ्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर नुकसान भरपाई जिंदल कंपनीने मंजूर केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा विमा उतरवण्याची मागणी केली होती. याबाबत उद्योगमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून जिंदल परिसरातील शाळांची माहिती घेतली जात आहे.

माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. जिंदल पोर्ट कंपनीतून गॅस वाहतूक करणाऱ्या कंपनीमार्फत हा विमा उतरवला जाणार आहे. जवळपास सातशेहून अधिक विद्यार्थ्यांचा विमा उतरवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 26/Mar/2025