राजापूर : ‘महिला सायकलिस्ट’चे दळेत स्वागत

राजापूर : देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाने आयोजित केलेल्या ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ मोहिमेमध्ये सहभागी झालेले ७४ सायकलिस्ट काल दळे येथे दाखल झाले. त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिलांनी केलेल्या पुष्पवृष्टीने गुजराथ येथून आलेले सर्व सायकलिस्ट भारावून गेले होते.

देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ‘सुरक्षित तट समृद्ध भारत’ या मोहिमेचे आयोजन केले आहे.

गुजरात येथे उद्घाटन झालेल्या या मोहिमेत ७० जवान आणि ४ महिला अशा ७४ सायकलिस्टचा समावेश आहे. हे सायकलपटू तालुक्यातील सागरी महामार्गावरील जैतापूर दळे येथे आले. त्यांचे त्रिवेणी संघाच्या महिलांनी औक्षण करत आणि पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत केले.

या वेळी त्रिवेणी संघाच्या सहसचिव रेशम लाड, जैतापूर ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी मार्गदर्शनावेळी मोहिमेतील सर्व सहभागी सायकलपटूंचे कौतुक केले. या कार्यक्रमाला जैतापूर, दळे येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 26/Mar/2025