उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ मार्च रोजी कसब्यात; छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या तयारीला वेग

चिपळूण : छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक स्तरावरील भव्य-दिव्य स्मारक उभारण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या २९ मार्च २०२५ रोजी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे दौऱ्यावर येणार आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी महायुती सरकारने गतीमान पावले उचलली असून, या दौऱ्याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

स्मारक उभारणीचा निर्णय झाल्यानंतर सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. गेल्या आठवड्यात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कसबा येथील सरदेसाई यांच्या वाडा जागेची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान त्यांनी स्मारकाच्या आर्किटेक्ट, निविदा प्रक्रिया आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती दिली होती. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ मार्च रोजी कसबा येथे भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. या दौऱ्यामुळे स्मारकाच्या कामाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर झाला नसला तरी तयारी जोरात सुरू आहे. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर बांधकाम विभागाकडून हेलीपॅडची उभारणी सुरू झाली असून, शिंदे हे हेलिकॉप्टरने कसबा येथे दाखल होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान स्मारकाच्या जागेची पाहणी, स्थानिक प्रशासनाशी चर्चा आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

मात्र, या दौऱ्याबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले आहे. काहींनी विचारणा केली असता त्यांना दौऱ्याची ठोस माहिती नसल्याचे समोर आले. तरीही, स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे असावे, अशी सरकारची संकल्पना असून, यासाठी आवश्यक निधी आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. कसबा येथील सरदेसाई वाडा ही ऐतिहासिक जागा स्मारकासाठी निवडण्यात आल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, हे स्मारक केवळ संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरणच करणार नाही, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही या भागाला नवसंजीवनी देईल.

उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून स्मारकाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. या भेटीदरम्यान स्थानिक प्रश्नांवरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दौऱ्याचा तपशील लवकरच जाहीर होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 26-03-2025