रत्नागिरी, दि. २६ मार्च २०२५: लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने येत्या २ एप्रिल २०२५ ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत जयेश मंगल कार्यालय, माळनाका येथे ‘लायन्स बझ’ या भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्पासह विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज लायन्स क्लबच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, खजिनदार अमेय वीरकर, सेक्रेटरी विशाल ढोकळे, ओमकार फडके, प्राची शिंदे आदी उपस्थित होते.
लायन्स क्लब गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यात लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोतीबिंदू निवारणासाठी कार्यरत आहे. ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करून तेथे आढळलेल्या रुग्णांना रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, सध्याच्या हॉस्पिटलची जागा अपुरी पडू लागल्याने एमआयडीसी परिसरात शेजारील प्लॉटवर तीन मजली इमारतीचे विस्तारित बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पात आय हॉस्पिटलच्या विस्ताराबरोबरच लायन्स ब्लड बँक सुरू करण्याचाही मानस आहे. या सर्व उपक्रमांसाठी लागणारा निधी उभारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेत डायलिसिस सुविधेबाबतही माहिती देण्यात आली. किडनी फेल्युअरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लायन्स क्लबने फेब्रुवारी २०२४ मध्ये डायलिसिस सेंटर सुरू केले. सध्या अत्यल्प दरात ही सुविधा दिली जात असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता मिळाल्यानंतर ती पूर्णपणे मोफत होणार आहे. डिसेंबर २०२४ पासून प्रत्येक रुग्णाला आठवड्यातून दोन डायलिसिस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापुढील डायलिसिससाठी अत्यल्प शुल्क आकारले जाईल. रत्नागिरीतील अपुऱ्या सुविधांचा विचार करून ही पुढाकार घेण्यात आला आहे.
‘लायन्स बझ’ हे प्रदर्शन केवळ निधी उभारणीपुरते मर्यादित नसून स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हाही यामागील उद्देश आहे. विशेषतः महिला बचत गट आणि उद्योजकांना यातून संधी मिळणार असून, ग्राहकांना कपडे, दागिने, हस्तकला वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले राहील. खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.
लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी यांनी सर्व व्यावसायिक आणि नागरिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले. स्टॉल बुकिंगसाठी प्राची शिंदे (९४२२३७६२२४ / १७६४४१७०७९) किंवा ओमकार फडके (९४२२०५०७६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. “हा उपक्रम रत्नागिरीच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा आहे. यातून मिळणारा निधी हॉस्पिटल विस्तारासह नवीन सामाजिक कार्यांना बळ देईल,” असे धुरी यांनी नमूद केले.
या प्रदर्शनाला रत्नागिरीसह बाहेरील व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने महिला उद्योजक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक नागरिकांमध्येही उत्साह असून, हॉस्पिटल विस्तारामुळे गरजूंना चांगल्या सुविधा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. लायन्स क्लबचे सदस्य आणि स्वयंसेवक या चार दिवसीय फेस्टिवलच्या यशस्वीतेसाठी तयारीला लागले असून, हा रत्नागिरीकरांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरेल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 26-03-2025











