‘सौगात-ए-मोदी’: अल्पसंख्याकांसाठी ३२ लाख जीवनावश्यक किटचे वितरण; रमजान ईदपासून सुरुवात

नवी दिल्ली, दि. २६ मार्च २०२५: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक मोर्चाने देशभरातील ३२ लाख गरजू अल्पसंख्याक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्याची ‘सौगात-ए-मोदी’ योजना रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू केली आहे. या योजनेची माहिती भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत दिली. देशात येत्या १ एप्रिल २०२५ रोजी रमजान ईद साजरी होणार असून, या किटची किंमत ५०० ते ६०० रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमांतर्गत रमजान ईदपासून ते नवरात्रापर्यंतच्या सर्व प्रमुख सणांदरम्यान गरजूंना किट वाटण्यात येणार आहे. यामध्ये ईद, बैसाखी, गुड फ्रायडे, भारतीय नववर्ष आणि गुढीपाडवा यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात या आठवड्यापासून दिल्लीसह काही राज्यांमध्ये झाली आहे. सिद्दिकी यांनी सांगितले की, ईदनिमित्त वाटण्यात येणाऱ्या किटमध्ये महिलांसाठी सूटचे कापड, पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा, तसेच सोयाबीन, साखर, सुकामेवा, बेसन आणि दूध पावडर यांचा समावेश असेल. “आमचे ३२,००० पदाधिकारी १००-१०० घरांना भेट देऊन ३२ लाख कुटुंबांपर्यंत हे किट पोहोचवतील. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंधुत्वाचा आणि ‘सबका साथ, सबका विकास’ हा संदेश देशभर पोहोचेल,” असे सिद्दिकी म्हणाले.

हा कार्यक्रम बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चा या योजनेच्या माध्यमातून देशभरात व्यापक संपर्क मोहीम राबवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाशी जोडले जाण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे दिसते. सणांच्या काळात गरजूंना मदत करताना पक्ष आपली सामाजिक बांधिलकीही दाखवू पाहत आहे.

मात्र, या मोहिमेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, “सर्व धर्मांचे सण साजरे करणे चांगले आहे, पण भाजप मतांसाठी काहीही करू शकते. आता भाजपचे लोक सूफी गाण्यांचाही आनंद घेत आहेत. बिहारमध्ये निवडणुका असल्याने हे सर्व सुरू आहे.” त्याचप्रमाणे, समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनीही टीका केली. ते म्हणाले, “जर भाजप खरोखरच मुस्लिमांसाठी काही करू शकते, तर त्यांनी किट देण्यापेक्षा मुस्लिमांना न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत.”

या टीकेला प्रत्युत्तर देताना जमाल सिद्दिकी यांनी सांगितले की, “हा उपक्रम राजकीय हेतूने नाही, तर गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाचे ध्येय आहे.” तरीही, बिहार निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘सौगात-ए-मोदी’ किटच्या वितरणामुळे गरजूंना सणांच्या काळात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या टीकेमुळे या योजनेचा राजकीय हेतूही तपासला जाऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत ही मोहीम देशभरात कशा पद्धतीने राबवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 26-03-2025