Kolhapur: बाळूमामांच्या रथोत्सवाला प्रचंड गर्दी

मुरगूड : महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सदगुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महत्वाच्या रथोत्सवाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्या, गुरुवारी होणाऱ्या महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापुरकडे नेण्यात आल्या.

याची सुरुवात निढोरी ता. कागल येथे धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने सुरू झाली. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. महाराष्ट्र- कर्नाटकातील १९ बग्गीतून आणलेल्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या होत्या.याच ठिकाणी घागरींचे स्वागत व पूजन केले जाते.

भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे. त्यामुळे या दूधाच्या घागरी निढोरीतून घेऊन जाण्याची दरवर्षीची प्रथा रुढ झाली आहे. आदमापुरातून आलेल्या बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीमध्ये दुपारी आगमन झाले.

उद्या द्वादशी दिवशी दूधाने बाळूमामांना अभिषेक

यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेमध्ये स्नान करून मारुती देवालयामध्ये जमले. बाळूमामा देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी रथाचे पूजन केले. बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडी व रथातुन दुपारनंतर आदमापुरकडे मार्गस्थ झाल्या. उद्या द्वादशी दिवशी सकाळी या घागरीतील दूधाने बाळूमामांना अभिषेक घालण्यात येईल. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे.

प्रशासनाची चोख व्यवस्था

बाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आले. मुरगूड आणि गारगोटी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 26-03-2025