रत्नागिरी : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ३ एप्रिल रोजी बैठक

रत्नागिरी : महापारेषण कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित समस्यांबाबत व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण व भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक ३ एप्रिल रोजी ११ वा. प्रकाशगंगा मुंबई मुख्यालयात होणार असल्याचे संघटनेची माहिती अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिली.

महापारेषण कंपनीत विविध पदांच्या भरती प्रक्रियेत कार्यरत कंत्राटी कामगारांना जादा १० मार्क द्यावे व त्यांना ४३ वर्ष वयापर्यंत नोकरीसाठी फॉर्म भरण्यास संधी द्यावी, १९% पगार वाढ व त्याचा फरक तातडीने द्यावा, असे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत.

काही ठिकाणी कंत्राटदार राष्ट्रीयीकृत बँकेत वेतन देत नाहीत. वेतन चिठ्ठी व पूर्ण वेतन वेळेवर देत नाही, कामगारांना धमकावून त्याच्या वेतनातून विशिष्ट रकमा वेगवेगळ्या गैरपद्धतीद्वारे परत घेतात, हे बंद होऊन दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, भरती प्रक्रियेत शासनमान्य आय. टी. आय वायरमन ट्रेड उत्तीर्ण उमेदवारांना विविध पदांवर नोकरी करता संविधानानुसार समान संधी उपलब्ध करावी, आदी प्रलंबित विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सचिन मेंगाळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 27/Mar/2025