देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर-मार्लेश्वर-कळकदरा रस्त्याचे काँक्रीटीकरण व रस्ता रुंदीकरण कामासाठी भू-संपादन करण्याबत व रस्त्याच्या बांधकामास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी चिपळूण संगमेश्वर आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.
रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम होत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण करताना त्याला आवश्यक असलेल्या रस्त्याखालील व दोन्ही बाजूचे जमिनीचे योग्य नुकसानभरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिनियम २०१३ या नवीन कायद्याप्रमाणे भूसंपादन करावे किंवा खासगी वाटाघाटीद्वारे रेडीरेकनरच्या ४ पट दराप्रमाणे शेतकरी/खातेदारांचे जमिनीचा मोबदला देवून जमीन अधिगृहीत करावी, यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी शेतकरी खातेदारांची, सार्वजनिक बांधकाम यांची संयुक्त बैठक घ्यावी. जमिनीचा मोबदला न देता अगर जमिनीचे भू संपादन न करता जबरदस्तीने काम सुरु केल्यास शेतकरी सनदशीर आंदोलनाच्या माध्यमातून यास विरोध करू, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत मतदार संघातील मौजे मुरादपूर, हातीव, निवेखुर्द, कासारकोळवण, आंगवली, मारळ, बामणोली, ओझरे, खडीकोळवण या गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.
याचाही विचार करून तातडीने जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांची तातडीने सभेचे आयोजन करून या विषयाचा निर्णय लागेपर्यंत रस्त्याचे कामकाजास स्थगितीबाबत प्रशासनास आदेश द्यावेत, अशी विनवणी केली आहे. विकास कामाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवू नये. असा विकास होऊ नये, अशी प्रामाणिक मागणी आहे. आमदार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, याची आशा निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 27/Mar/2025














