चिपळूण : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नमन लोककलेला राजाश्रय मिळत आहे. ही बाब महत्त्वपूर्ण आहे. कोकणातील दशावतारानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नमन लोककला आता राजदरबारात पोहोचली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात यंदा दुसरा नमन महोत्सव चिपळूणमध्ये केला आहे. नमनाबरोबरच भविष्यात जाखडी लोकनृत्य कलेलादेखील राजमान्यता मिळायला हवी, त्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगत आपली संस्कृती, परंपरा टिकवायची असेल तर आपल्या लोककला कायम राहिल्या पाहिजेत.
त्यासाठी पर्यटन आणि लोककला याची सांगड घालायला हवी, असे मत गुहागरचे माजी आ. डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते चिपळुणात दुसऱ्या नमन लोककला महोत्सवाचा दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे चिपळूणमध्ये २७ मार्चपर्यंत नमन महोत्सव साजरा होत आहे. या महोत्पावाचे उद्द्घाटन मंगळवारी सायंकाळी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे माजी आमदार विनय नातू यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सांस्कृतिक विभागाचे सचिव बलकंडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, २.प. प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नमन महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, सुधाकर मासकर, सांस्कृतीक संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. नातू म्हणाले, तत्कालीन सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांनी सिंधुदुर्गमधील दशावतार लोककलेला राजाश्रय मिळवून दिला आणि आता दशावतार हा देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. शासन दशावतार महोत्सव दरवर्षी घेते. या पार्श्वभूमीवर नमनला देखील राजाश्रय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळाले आहे. या पुढच्या काळात कोकणच्या पर्यटनवाढीसाठी या लोककलेला उपयोग कसा करता येईल, त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, तसेच जाखडी लोककलेसही राजाश्रय मिळायला हवा. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी, कोकणची ही लोककला कोकणपुरती मर्यादीत न ठेवता तिचा राज्यात तसेच देशात प्रसार झाला पाहिजे. आपण प्रथमच संकासूर व नमन पाहिले, ज्या प्रमाणे अन्य राज्ये तेथील लोककलांचा वापर पर्यटन वाढीसाठी करतात, तसा कोकणाने देखील करून घेतला पाहिजे, असे सांगितले. युयुत्सु आर्ते यांनी, लवकरच जिल्ह्यातील नमन मंडळ परदेश दौरा करणार आहोत. जिल्ह्यात २० हजारहून अधिक नमन कलाकार आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. दरवर्षी १०० कलाकारांना अनुदान दिले जाते. त्यामध्ये वाढ झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.
बापू काणे यांनी राजाश्रयासह या कलेला लोकाश्रय लाभला आहेच. मात्र, असे महोत्सव भरविताना त्याची प्रचार व प्रसिद्धी व्हायला हवी तरच लोके दाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले. यानंतर संगमेश्वर व गुहागर येथील दोन नमन सादर झाले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आजची नमने…
या नमन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी २७ रोजी श्रीराम नाट्य नमन मंडळ कामथे (चिपळूण), नवयुग सेवा नमन मंडळ आसगे (लांजा), श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ कुवे (ता. लांजा) व शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ संगमेश्वर यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 27/Mar/2025














