खेड : तालुक्यातील घाणेखुंट गावातील धापसेवाडी की मधलीवाडी हा वाद खेड येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात पावणेपाच वर्षे सुरू होता. येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोद तोकले यांनी २५ मार्चला या निकाल देऊन या वाडीस घाणेखुंट मधलीवाडी असे संबोधण्याचा निर्णय दिला. तसे सर्व अभिलेख नोंद करताना मधलीवाडी असाच उल्लेख करण्याचा निर्णय दिला.
तालुक्यातील घाणेखुंट हा गाव उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील मधलीवाडीमध्ये ६५ घरे असून विविध आडनावाची कुटुंबे वास्तव्य करतात. पूर्वापार या वाडीला मधलीवाडी संबोधले जात असे. मात्र दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत लोटे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा वापर करून त्या वाडीची ओळख बदलण्याचा घाट घातला. मग हळूहळू शासनदरबारी, पत्रव्यवहारामध्ये या वाडीचे नाव धापसेवाडी असल्याचे नमूद करू लागले.
जिल्हा परिषदेची शाळा मधलीवाडी. शाळा सोडल्याचे दाखले मधलीवाडी. असे असताना मधलीवाडी नाव गायब करण्याचा खटाटोप झाला. सर्व रेकॉर्ड बेकायदेशीरपणे बदलले गेले. यासाठी मधलीवाडी ग्रामस्थांनी गेली १०/१२ वर्षे शासनदरबारी पत्रव्यवहारांचा लढा लढले.
परंतु हाती काहीच प्राप्त न झाल्याने सरतेशेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. ९ जून २०२० रोजी दावा दाखल करण्यात आला. न्यायालयाने मधलीवाडी ग्रामस्थांना न्याय दिला. या खटल्यात मधलीवाडी या नावाकरीता ग्रामस्थांच्या वतीने अॅड. संदेश वंदना गणपत चिकणे यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 27/Mar/2025














