‘कुंभार्ली घाटा’चा ताबा राष्ट्रीय महामार्ग विभाग घेणार

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट आता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात जाणार आहे. धोकादायक घाटरस्त्यावरील सुरक्षेच्या उपायोजना करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

गुहागर-विजापूर राज्य महामार्गाचे २०१४ मध्ये राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. गुहागर तालुक्यातील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका ते पिंपळीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. पुढील रस्ता डांबरी आहे. १४ किलोमीटर लांबीचा कुंभार्ली घाट हा डांबरीच आहे. या घाटात धोकादायक वळणे आहेत. रत्नागिरी-नागपूर मार्गावरील आंबाघाटाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारी अवजड वाहतुकीची वाहने कुंभार्ली घाटमार्गे वळवण्यात आली आहेत. त्यामुळे कुंभार्ली घाटात अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. अवजड वाहनांमुळेच पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडतात. हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.

घाटातील धोकादायक वळणावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे घाटात सतत अपघात होत आहेत. घाटात मालवाहू ट्रक बंद पडल्यानंतर वाहतूककोंडी होते. येथे महिन्यातून एक-दोन अपघात ठरलेले असतात. काही दिवसांपूर्वी कुंभालींतील मायलेकाचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. घाटाची पाहणी करण्यात आली.

अपघात रोखण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च बजेटमधून केला असताना अपघात कसे होतात, असा जाब स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. आता मात्र हा घाट राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्याची तयारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. कुंभार्ली घाटातील सुरक्षेच्या उपाययोजनांसह घाटातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्याचा प्रस्ताव यापूर्वीचा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात काही मागण्या आल्या. काही लक्षवेधी मांडण्यात आल्या. त्याला अपेक्षित असे उत्तर आमच्या खात्याकडून देण्यात आले. घाटरस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे- नजीब मुल्ला, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 27/Mar/2025