खेड : जगबुडी नदीपात्रातून ३० हजार घनमीटर गाळ उपसा

खेड : खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने कमालीचा वेग घेतला आहे. गेल्या २१ दिवसात ३० हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गाळ उपसण्यासाठी २ पोकलेनची घरघर सुरू आहे. नदीपात्रातून उपसलेल्या गाळाचे साठे केले जात आहेत. यानंतर शेतकरी स्वखर्चाने गाळ घेवून जात आहेत.

अलोरे येथील जलसंपदा विभागामार्फत गाळ उपसा प्रक्रिया सुरू आहे. यासाठी २ पोकलेन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय अन्य अत्यावश्यक साधनसामुग्रीचाही समावेश आहे. गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत भरती-ओहोटीचाही अडसर उभा ठाकत आहे. यामुळे दुपारच्या सुमारास गाळ उपसा प्रक्रिया बंद ठेवावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. गाळ उपसा प्रक्रियेकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे विशेष लक्ष असून सातत्याने जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सूचना करत आहेत. याचमुळे गाळ उपसा प्रक्रियेने वेग घेतला आहे.

गेल्या २१ दिवसात ३० हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. उपसलेला गाळ शेतकरी स्वतःहून वाहून नेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हा गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. याचमुळे शेतकऱ्यांना गाळ घेवून जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

यंदा जगबुडीच्या पुराचे संकट दूर होईल
जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे बारीक लक्ष आहे. पात्रात साचलेला गाळ परिपूर्णरित्या उपसा केला जाणार आहे. यामुळे यंदा जगबुडीच्या पुराचे संकट दूर होवून व्यापाऱ्यांसह नदीकाठचे रहिवासी सुटकेचा निःश्वास टाकतील, असा खेड शहर शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 27/Mar/2025