मंडणगड : गृहराज्य मंत्री आमदार योगेश कदम यांचे जनसंपर्क कार्यालय दि. 26 मार्च 2025 रोजी भिंगळोली येथील तहसील कार्यालयाच्या समोर युवा सेनेच्या कार्यालयात सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रशासकीय यंत्रणेशी सबंधित प्रश्न व समस्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आता सोडवण्यात येणार आहेत. समस्यांचा निपटारा करण्यासाठी गृहराज्य मंत्र्यांनी आपल्या एका शासकीय स्वीय सहाय्याची नेमणूकही केली आहे.
नुकतेच ना. योगेश कदम यांनी आपल्या मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यात आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या संकल्पनेची घोषणा केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, मंत्री असल्याने कारभारात व्यस्त जरी असलो तरी माझ्या मतदार संघातील माझ्या नागरिकांची मला काळजी आहे. कुठेही असलो तरी माझे मतदार संघाकडे माझे पूर्ण लक्ष असते. येथील सामान्य ते सामान्य नागरिकांची प्रशासकीय समस्या किंवा त्यांची शासकीय कामे प्रलंबित राहू नयेत त्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी आपण आपले जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहोत. या त्यांच्या घोषणेनंतर चारच दिवसांनी तात्काळ कार्यवाही होऊन आज गृहराज्य मंत्र्यांचे जनसंपर्क कार्यालय तालुक्यात सुरूही झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कार्यतत्पतेचे समाधानही व्यक्त केले आहे.
यापुढील काळात दर बुधवारी या जनसंपर्क कार्यालयात शासकीय स्वीय सहाय्यक उपस्थित राहणार आहेत. स्वीय सहाय्यक प्रविण मोरे, श्री. क्षीरसागर हे दर बुधवारी उपस्थित राहून नागरीकांच्या तक्रारी स्वीकारतील व विविध समस्या सोडवण्यात ते तत्काळ सहकार्य देखील करतील. शिवाय केलेल्या कामकाजाचा आवाहल ना. योगेश कदम यांना दिला जाईल.
(26) रोजी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयात स्वीय सहाय्यक प्रविण मोरे, दत्ता क्षीरसागर, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, युवासेना प्रांत कार्यकारिणी सदस्य चेतन सातोप, माजी जि.प. सदस्या अस्मिता केंद्रे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर,विभागप्रमुख दीपक मालुसरे, सिध्देश देशपांडे, युवासेना तालुका उपाध्यक्ष प्रतिक पोतनीस यांच्यासह तालुक्यातील शिवसैनीक व युवासैनिक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरीकांनी विविध शासकीय समस्या मांडल्या व त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही सुध्दा सुरु करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 28-03-2025














