पत्नीची हत्या करून सुटकेसमध्ये मृतदेह ठेवला.. स्वतः झुरळ मारण्याचं औषध प्यायला

पुणे : बंगळुरुतील मराठी हत्याकांडातील आरोपी असलेल्या पती राकेश खेडेकरनेही झुरळ मारण्याचे औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राजेशवर पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारानंतरच त्याला बंगळुरू पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून हे दोन्ही पती-पत्नी मूळचे महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत. राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) असे या पतीचे नाव आहे. राकेश आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर (वय 32) हे दोघे मुंबईत राहत होते. महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी मुंबईहून बंगळुरुला राहायला गेले होते.

दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये हे दोघे भाड्याने राहत होते. राकेशने मंगळवारी गौरीची चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये टाकला अन् तो पळून पुण्यात आला होता. राकेशने बायकोच्या पालकाना फोन करुन तिची हत्या केल्याची माहिती दिली असल्याचे वृत्त आहे. पुण्यातूनच त्याने आपल्या फ्लॅटमालकाला याची माहिती दिली. त्यामुळे, फ्लॅटमालकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुणे पोलिसांनी रात्री उशिरा फोनच्या लोकेशनवरुन राकेशला ताब्यात घेतले. दरम्यान, राकेशने झुरळ मारण्याचे औषध प्यायल्याची माहिती समोर आली आहे.

बंगळुरू पोलिसांच्या माहितीवरुन राकेश खेडेकरला पुण्यातील पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर, सकाळी 8 वाजता त्याला ससून रुग्णालयात आणले आहे. दरम्यान, त्यांने झुरळ मारण्याचे औषध आणि फिनाईल पिल्याने सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घशातून काही पदार्थ गिळताना त्याला त्रास होतोय. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडण्याअगोदरच त्याने ते औषध प्यायल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अगोदर पुण्यातील भारती हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर, ससून रुग्णलायात दाखल करण्यात आल्याचे ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. त्यानुसार, आता तपास सुरू असून उपचारानंतरच उद्या राकेशला बंगळुरू पोलिसांच्या स्वाधीन केलं जाऊ शकतं.

राकेशची पत्नी मूळ साताऱ्याची

राकेशची पत्नी गौरी सांबरेकर ही मूळची साताऱ्याची असून तिने मास मिडीयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. ती बंगळुरुत नोकरी शोधत होती, तर राकेश खेडेकर हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. महिनाभरापूर्वीच हे दोघे बंगळुरुत राहायला आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. याच भांडणाचा राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला, त्याने किचनमधील सुरी घेऊन गौरीला दोन-तीन वेळा भोसकले. त्यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 28-03-2025