खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यातून ऐन उन्हाळ्यात गळती सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे.
बोगद्यातील कामांवर कोट्यावधी रुपयांचा चुराडा करुनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. त्या रोखण्यासाठी ‘ग्राऊटींग’चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणी लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांचा प्रवास हा खरतडच राहणार असून दोन्ही बोगद्यात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात ‘विघ्न’ निर्माण झाले आहे.
बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटींगचा अवलंब केला. यासाठी २० हजाराहून अधिक सिमेंट बेंगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता. मात्र बोगद्यात गळतींचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे.
प्रथम सुरू करण्यात आलेल्या या बोगद्यातून गळती लागल्यानंतर मुंबईतील आयआयटीचे प्रा. एस. के. यांनीही प्रत्यक्ष बोगद्याची पाहणी करत राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचनाही केल्या होत्या. तज्ज्ञांच्या सल्त्याचा काही ही उपयोग झाला नसल्याची बाब पुढे आली आहे. बोगद्यात गळती सुरूच असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.
बोगद्यातील ‘कामावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही सुरू असलेल्या गळतींमुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. तर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या बोगद्यात देखील गळती लागल्याचे दिसून येत असून या गळतीवर ठोस उपाययोजना व्हावी अशी मागणी आता वाहन चालकांमधून जोर धरू लागले आहे.
कशेडी बोगद्यातून प्रवास वेगवान अन् आरामदायी होण्याच्या शक्यतेने चाकरमानी बिनधास्त होते. मात्र बोगद्यात सुरू असलेल्या गळतीमुळे या बोगद्यातून प्रवास करताना दुचाकी चालक चालकांची मात्र त्रेधा होत आहे.
मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले अवलंब फोल ठरल्याने वाहनचालक भीतीच्या सावटाखाली आहेत. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते आता कोणत्या नव्या उपाययोजनांचा अवलंब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महामार्गावरील या दोन्ही बोगद्यामध्ये ज्या ठिकाणी गळती सुरू आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या वतीने ती गळती थांबवण्यासाठी काम सुरू असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण केलेले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये संपूर्णपणे गळती बंद होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई आयआयटी चे अधिकारी डी एन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. तसेच विद्युत पुरवठ्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यात बोगद्यातील जवळपास सर्वच कामे मार्गी लागलेली आपणास दिसून येतील अशी माहिती राष्ट्रीय बांधकामचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 28/Mar/2025














