रत्नागिरी, दि. २८ मार्च २०२५ : रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप प्रीतम केदार (वय ५०, वर्ग १) यांना ११ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही यशस्वी सापळा कारवाई आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रत्नागिरी एसीबी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तक्रारीचा तपशील
तक्रारदार (वय ५०), हे संगमेश्वर येथील पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अखत्यारीतील संगमेश्वर येथील धान्य गोदामास जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि तहसीलदार संगमेश्वर यांनी २२ मार्च २०२५ रोजी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार गैरहजर होते. त्यानंतर आरोपी अधिकारी प्रदीप केदार यांनी गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यात तफावत असल्याचे नमूद केले. तक्रारदारांच्या गैरहजेरीचा आणि तफावतीचा नकारात्मक अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठवण्यासाठी केदार यांनी तक्रारदारांकडे सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ११ हजार रुपये निश्चित झाले. ही रक्कम आज, २८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारताना केदार रंगेहात पकडले गेले.
सापळा कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २८ मार्च रोजीच तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी करून त्याच दिवशी सायंकाळी सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकात सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा दीपक आंबेकर, पोहवा संजय वाघाटे, पोहवा विशाल नलावडे आणि पोअं राजेश गावकर यांचा समावेश होता.
मार्गदर्शन आणि देखरेख
या कारवाईसाठी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, संजय गोविलकर आणि रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने (एजंट) लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२२२८९३, ७५८८९४१२४७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध आहे.
खळबळजनक कारवाई
या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा संदेश देण्यात आला आहे.














