रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामस्थांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी जिल्हा परिषदेद्वारे विविध उपक्रम राबविले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात पाणी स्रोतांचे तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीमधील तब्बल ७हजार ७९० सार्वजनिक स्रोत तपासले जाणार आहेत.
जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील कुटुंबाना घर घर नल से जल या प्रमाणे प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट असून, ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत खोतनिहाय स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापुर्वी दि.०१ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल २०२५ व पावसाळ्यानंतर दि.०२ ऑक्टोबर २०२५ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्हयातील ७७९० सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
स्वच्छता सर्वेक्षणामध्ये स्रोता भोवतीचा परिसर, पाणी पुरवठा संरचना व व्यवस्थापनातील जे काही दोष आढळून आल्यास त्याचे निराकरण वेळेत करता येऊन संभाव्य साथीस प्रतिबंध करण्यास मदत होणे हा उद्देश आहे.
सदरच्या सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छता सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सार्वजनिक खोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व वैद्यकिय अधिकारी यांचेवर या सर्वेक्षणाची जवाबदारी आहे. हे अत्यंत वैशिष्टपूर्ण सर्वेक्षण असून सर्वेक्षणाच्या निकषांनुसार ग्रामपंचायतींना स्त्रोतांच्या वापरानुसार व निर्माण झालेल्या जोखीमेनुसार वर्गीकरण करुन व त्यानुसार लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरीत केले जाणार आहे.
लाल कार्ड– लाल कार्ड ग्रामपंचायतींमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमींच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात यावे. ग्रुप पंचायतीमध्ये एका गावात जरी वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावांचे नाव टाकून लाल कार्ड देण्यात यावे.
हिरवे कार्ड– ग्रामपंचायतीमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या खोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात यावे.
पिवळे कार्ड– ग्रामपंचायतीमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या खोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड देण्यात यावे. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचे नांव टाकून पिवळे कार्ड देण्यात यावे.
चंदेरी कार्ड– सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या व पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येते.
पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. – श्रीम. वैदेही रानडे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 29/Mar/2025














