रत्नागिरी : महायुतीमध्ये राज्यातील ८० ते ८५ टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला असून उर्वरित जागांबाबत भौगोलिक स्थितीचा विचार करुन महायुतीचे नेते मंडळी निर्णय घेतील आणि लवकरच उमेदवारांची घोषणा होईल, असे शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. गुहागर विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय पेंडिंग असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीमध्ये समन्वय असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत फॉर्म्युला सांगून, बाशिंग बांधून असलेल्यांना गप्प बसवले असल्याची टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या नेत्यांनी समन्वय राखत जागा वाटपाबाबत निर्णय घेत आहेत. ८० ते ८५ टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. काही इच्छुक मंडळी तिकीट मिळणार नसल्याने पलिकडे जात आहेत, कोणी गेल्यावर महायुतीला काही फरक पडणार नाही. ज्या जागांबाबत निर्णय झालेला नाही, त्यासाठी तेथील परिस्थितीचा विचार तीनही पक्षांचे नेतेमंडळी करतील आणि त्यावर तोडगा काढतील असेही, ना. सामंत यांनी सांगितले.
माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेतून लढावे की भाजपमधून याबाबतचा निर्णय भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. रत्नागिरीवर भाजपचे पदाधिकारी दावा करीत असल्याबाबत ते म्हणाले की, प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मात्र याबाबतचा निर्णय जिल्हा पातळीवर नाही तर राज्यातील नेतेमंडळी घेतील, माझ्याबाबत जो निर्णय वरिष्ठ घेतील तो मला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार पहिल्या टर्मचे आमदार
रोहित पवार व जयंत पाटील यांच्यात सध्या कॉम्पिटिशन सुरू आहे. मविआमध्ये ट्रिट करण्याची स्पर्धा सुरू आहे. रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. रोहित पवारांनी दावोसबाबत केलेल्या ट्विटला कायदेशीर उत्तर एमआयडीसी देईल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 07/Oct/2024














