दापोलीत बैल चोरीचा गुन्हा उघडकीस; तिघांवर गुन्हा दाखल

दापोली, दिनांक २९ मार्च २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बैल चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. २५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावरी चे भाटले, बरोडी येथील कंपाउंड सर्व्हे क्रमांक ४८/१६ मध्ये चरण्यासाठी सोडलेला एक साडेतीन वर्षांचा काळ्या रंगाचा सहिवाल जातीचा बैल चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेला बैल एका टेम्पोत सापडला आहे.

फिर्यादी आनंद प्रफुल्ल केळसकर (वय ३६) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या मालकीच्या कंपाउंडमध्ये गुरे चरण्यासाठी सोडली होती. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गुरांना आणण्यासाठी गेल असता त्यांचा १२,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा सहिवाल जातीचा बैल गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध करूनही बैल सापडला नाही, त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची खात्री पटली.

टेम्पो पकडल्याने गुन्हा उघडकीस
दि. २७ मार्च २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आनंद केळसकर यांना माहिती मिळाली की, लालकट्टा के. के. व्ही., दापोली येथे स्थानिकांनी एक गुरांचा टेम्पो पकडला असून तो दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. ही माहिती मिळताच फिर्यादी तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी टेम्पो (क्रमांक MH.08 AP 1581) मधील गुरांची पाहणी केली असता, त्यांचा चोरीस गेलेला साडेतीन वर्षांचा काळ्या रंगाचा बैल त्यात सापडला.

या प्रकरणात टेम्पो चालक देवेंद्र रविंद्र झगडे (वय ३२), सदानंद विठोबा जाधव (वय ४०) आणि गोरखनाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या तिघांनीच फिर्यादीचा बैल चोरल्याची खात्री पटल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दापोली पोलीस ठाण्यात दि. २८ मार्च २०२५ रोजी दुपारी २:०४ वाजता गुन्हा क्रमांक ५७/२०२५ नोंदवण्यात आला. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने दापोली परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरीच्या उद्देशाबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. स्थानिकांनी पकडलेल्या टेम्पोमुळे हा गुन्हा उघडकीस आल्याने नागरिकांमध्येही सतर्कता निर्माण झाली आहे.

या घटनेनंतर दापोलीतील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गोहत्येच्या उद्देशाने होणारी गुरांची वाहतूक नेहमीच चिंतेचा विषय ठरली आहे. ग्रामस्थांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून संशयितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 29-03-2025