लांजा, दिनांक २९ मार्च २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कपडे धुण्याच्या दगडावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय व्यक्तीने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास गोळवशी, तेलीवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी (महिला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या कपडे धुण्याच्या दगडावर कपडे धूत होत्या. त्यावेळी आरोपी विजय शांताराम शिनगारे (वय ३२) हा दारूच्या नशेत तिथे आला. त्याने हातात लाकडी दांडका घेऊन फिर्यादींना उद्देशून सांगितले की, “हा कपडे धुण्याचा दगड आमचा आहे, तू इथे कपडे धुवू नकोस.” यावर फिर्यादींनी उत्तर दिले की, “आम्ही नेहमीच इथे कपडे धुतो.” या उत्तराचा राग आल्याने आरोपीने संतापात फिर्यादींना ढकलून खाली पाडले.
आरोपीने यापुढे जाऊन फिर्यादींच्या डोक्यात आणि कपाळावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. याशिवाय, आरोपीने लाथा-बुक्क्यांनी फिर्यादींच्या छातीवर आणि पाठीवर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर शिवीगाळ करत “ठार मारण्याची” धमकी दिली. या हल्ल्यादरम्यान फिर्यादींच्या एक वर्षाच्या नातवाला देखील ढकलून देण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल
या हल्ल्यानंतर फिर्यादींनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दि. २८ मार्च २०२५ रोजी दुपारी १:५१ वाजता गुन्हा क्रमांक ६७/२०२५ नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), आणि ३५२ अंतर्गत आरोपी विजय शांताराम शिनगारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 29-03-2025














