गुहागर : दुर्गादेवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर : वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान धार्मिक, सांगीतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन देवस्थानने केले आहे, अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली आहे.

१२ ऑक्टोबरपर्यंत दररोज स. ६ ते ६.३० वा. श्रींची पूजा, ७.३० ते १२ वा. सप्तशती पाठवाचन, दुपारी १२ वा. महानैवेद्य, सायं ६.३० ते ७ वा. श्रींची सायंपूजा, सायं. ७.१५ ते ८ वा. श्रींची गोंधळ, आरती व मंत्रपुष्प असे कार्यक्रम होणार आहेत.

नवरात्र उत्सवातील श्रींच्या महावस्त्राचा लिलाव ८ ऑक्टोबरपर्यंत दु. ३ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. कुलदेवतेचा प्रसाद म्हणून देवीची साडी घेण्यासाठी गुहागर तालुक्याबरोबरच मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून महावस्त्रांच्या लिलावासाठी भक्त येतात.

नवरात्रौत्सवात ४ रोजी समिधा कथ्थक नृत्य, ५ रोजी रात्री कलारंग बरवडे खंडाळा प्रस्तुत मंगलाक्षता नाटक होईल. ६ रोजी कुमारिका पूजन, रात्री संगीत नाटक ‘होनाजी बाळा’, ७ रोजी रात्री डॉ. राजश्री सोमण यांचे ‘महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्य’ या विषयावर व्याख्यान, नागालँडमधील मुलींचा विशेष सन्मान, पारंपरिक नृत्य व गीतगायन, ८ रोजी रात्री जादूचे प्रयोग, ९ रोजी रात्री दांडिया तसेच उत्कृष्ट नृत्य व वेशभूषा स्पर्धा होईल. दि. १० रोजी रात्री महिलांसाठी पैठणीचा खेळ, दि. ११ रोजी सकाळी सुवासिनी पूजन, रात्री श्री देव गोपाळकृष्ण आरती मंडळ यांची संगीत महाआरती, ९.३० वा. स्वरसिंधू प्रस्तुत गीतरामायण, दि. १२ रोजी सकाळी ७ ते १२ वा. नवचंडी व पूर्णाहुती, दुपारी महाप्रसाद, रात्री दुर्गाश्री महिला मंडळाचे भजन, कीर्तन जुगलबंदी होईल. रात्री १२ वा. लळीताचे कीर्तन आदी कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थानकडून कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:35 PM 07/Oct/2024