दापोलीत अवैध गुरे वाहतुकीचा पर्दाफाश; पाच जणांवर गुन्हा दाखल, टेम्पोसह जनावरे जप्त

दापोली, दिनांक २९ मार्च २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दि. २७ मार्च २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लाल कट्टा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून टेम्पोसह तीन जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

फिर्यादी ज्ञानेश्वर सखाराम साखरकर (वय ४६, पोलीस हवालदार, दापोली पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवेंद्र रविंद्र झगडे (वय ३२), गोरखनाथ मधकर शिंदे (वय ४०), सदानंद विठोबा जाधव (वय ४०), अमित (पिंट्या) अशोक मिरगल आणि महेंद्र दत्ताराम बागकर (वय ४२) यांनी संगनमताने हा अवैध प्रकार केला. हे सर्वजण करजगाव ते वेळवी (ता. दापोली) या मार्गावर गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करत होते. यासाठी त्यांनी टाटा कंपनीच्या MEGA XL मॉडेलचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक MH 08 AP 1581) वापरला.

या टेम्पोमध्ये जनावरांना दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना सूर्यप्रकाश, पुरेशी हवा, चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. शिवाय, जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परमिट किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रही आरोपींकडे नव्हते. ही जनावरे वेळवी येथील आरोपी अमित मिरगल याला विक्रीसाठी नेण्यात येत होती.

दापोली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी लाल कट्टा परिसरात छापा टाकला. रात्री १० वाजता आरोपींचा टेम्पो पकडला गेला. या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह तीन जनावरे जप्त केली. जप्त मालामध्ये १२,००० रुपये किमतीचा साडेतीन वर्षांचा काळपट रंगाचा बैल, ७,००० रुपये किमतीची सात वर्षांची काळपट रंगाची गाय आणि १,५०० रुपये किमतीचा दोन महिन्यांचा काळपट रंगाचा गाईचा पाडा यांचा समावेश आहे. तसेच, ३,००,००० रुपये किमतीचा टेम्पोही जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल
या घटनेनंतर दि. २८ मार्च २०२५ रोजी पहाटे ५:२५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८/२०२५ नोंदवण्यात आला. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(a), ११(१)(d), ११(१)(h), ११(१)(i), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४७, भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३(५) आणि मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १२५ अंतर्गत पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांचा तपास सुरू
दापोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अवैध जनावर वाहतूक आणि विक्रीच्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी व्यापक चौकशी सुरू केली आहे. जप्त केलेली जनावरे पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात पशुपालन हा मोठा व्यवसाय असून, अशा अवैध प्रकारांमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 29-03-2025