रत्नागिरी : परटवणे नाक्याजवळ मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी, दिनांक २९ मार्च २०२५: रत्नागिरी शहरातील परटवणे नाका येथून मिरकरवाड्याकडे जाणाऱ्या रोडच्या दक्षिण बाजूस असलेल्या एका बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगाराचा अड्डा उघडकीस आला आहे. दि. २८ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:५० वाजता घडलेल्या या घटनेत पोलिसांनी ६८ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल केला असून असून, ४६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी प्रवीण पुरुषोत्तम वीर (वय ४३, पोलीस हेड कॉन्स्टेबल, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन दत्ताराम सुवरे (वय ६८) हा परटवणे नाका परिसरातील बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगार खेळत होता. त्याच्याकडे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम आढळून आली. कोणत्याही परवान्याशिवाय हा अवैध जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ४५५ रुपये रोख रक्कम आणि ८ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य (मटक्याशी संबंधित वस्तू) यांचा समावेश आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

या घटनेनंतर दि. २८ मार्च २०२५ रोजी दुपारी ३:५५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२५ नोंदवण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायदा १९३० च्या कलम १२(अ) अंतर्गत आरोपी गजानन दत्ताराम सुवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील काही भागांत मटका जुगाराचे अड्डे सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. परटवणे नाका हा रत्नागिरीतील वर्दळीचा परिसर असून, येथे जुगाराचा अड्डा उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच, अशा अवैध कृत्यांवर कायमस्वरूपी बंदी यावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 29-03-2025