चिपळूण : तालुक्यातील भिले बौद्धवाडी येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय देण्याकरिता, नुकसान भरपाई मिळण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन दिले.
भिले बौद्धवाडी येथील तरुण सतीश सकपाळ याचा त्याच्या घराच्या परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला असा बौद्धजन हितसंरक्षक समितीचा आरोप आहे. दिवंगत सतीश सकपाळ यांच्या पश्चात त्याची पत्नी नीता, वृद्ध आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सतीश सकपाळ हा या कुटुंबातील एक कर्ता पुरुष होता. त्याच्यावरच या कुटुंबाचा डोलारा होता. मात्र त्याचेच निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तथा शासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित कुटुंबाला न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, चिपळूण या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत सावंत यांनी भिले येथील सतीश सकपाळ मृत्यू प्रकरणाची सखोल माहिती दिली.
तसेच या संबंधित कुटुंबाला शासनाकडून दहा लाख रुपयांची मदत करण्यात यावी, तसेच त्यांची पत्नी नीता सकपाळ हिला महावितरणच्या सेवेत योग्यतेप्रमाणे सामावून घेण्यात यावे. जेणेकरून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कायमस्वरूपी होऊ शकेल. त्या दृष्टीने आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 07/Oct/2024














