दापोली : कोकण किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची अंडी संवर्धित करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कासवांचा मृत्यू रोखण्यासाठी कासव अपवर्जक साधन अर्थात टर्टल एक्सक्लुडर उपकरण (टीईडी) तयार केले आहे. या उपकरणामुळे जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांची सुखरूप सुटका होण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या बंदर विभाग, नेट फिश एमपीईडीए, दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिले टीईडी उपकरण तयार करण्यात आले आहे. हे उपकरण धातूच्या पट्ट्या आणि जाळीपासून बनलेले असून, ट्रॉलिंग जाळीला बसविण्यात आले आहे. त्यामुळे कोळंबी बारमधून जाळीच्या मागील बाजूस जातात, तेव्हा कासव आणि इतर मोठे प्राणी धातूच्या जाळीला धडकतात आणि जाळीतून पुन्हा बाहेर पडतात.
या उपकरणाचे प्रात्यक्षिक दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात घेण्यात आले. यावेळी बंदर परवाना अधिकारी दीप्ती साळवी, नेट फिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम, अतुल साठे, गोपीचंद चौगुले यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.
अमेरिकेत कोळंबी जाणे शक्य
कासवांच्या मृत्यूमुळे अमेरिकेने कोळंबी निर्यातीवर २०१९ पासून बंदी घातली आहे. मात्र, या उपकरणामुळे कासवांचे प्राण वाचल्यास कोळंबीवर घातलेली निर्यातबंदी उठविण्यास मदत होणार आहे. त्यासाठी हे उपकरण वापरण्याचे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे.
“टीईडी पद्धतीमुळे अमेरिकेने लादलेली कोळंबीवरील निर्यातबंदी उठवण्यास मदत होणार आहे. निर्यातबंदीमुळे गेल्या सहा वर्षांपासून कोळंबीचे दर पडले असून, ४० टक्के निर्यात कमी झालेली आहे.-गोपीचंद चौगुले, अभ्यासक.
“ट्रॉलिंगवर टीईडी उपकरण बसवणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु, उपकरण उपलब्ध होत नसल्याने तसेच मच्छीमारांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याने कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही – संतोष कदम, राज्य समन्वयक, एमपीईडीए मुंबई’
“शासनाने अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रात्यक्षिक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मच्छीमारांनी काळजीपूर्वक प्रात्यक्षिक पाहणे गरजेचे आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर दंडाची तरतूद करण्यात आली आहे- दीप्ती साळवी, परवाना अधिकारी, दाभोळ‘
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:25 PM 29/Mar/2025
