जि. प. शाळा पूर्णगड नं.१ शाळेत मुलांनी भरवला ‘आनंदी बाजार’

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, पूर्णगड नं. १ या शाळेत वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहित केले जाते. याचाच एक भाग असलेल्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत “आनंदी बाजार” हा उपक्रम आज शाळेत उत्साहात पार पडला.

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी पूर्णगड परिसरात उपलब्ध असलेल्या वस्तू, घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ यांची खरेदी-विक्री केली. बाजारात जाऊन दैनंदिन व्यवहार कसे केले जातात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, क्षमप्रतिष्ठा, उद्योगशीलता, व्यावसायिकता, हिशोब करणे, स्वावलंबन, व्यवहारज्ञान या गुणांची वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी ग्रामस्थ, पालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 29/Mar/2025