Ladki Bahin Yojana : “लाडकी बहीण योजना बंद होणार” : राज ठाकरे

Raj Thackeray MNS Chief Gudi Padwa Speech, Ladki Bahin Yojana : मराठी माणसाला विळखा पडतो आहे. मुंबईत आम्हाला सांगता की मराठी बोलणार नाही. मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार. महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेला पाहिजे. आपल्या जातीबाबत प्रेम चांगले आहे.

परंतु, दुसऱ्या जातीबाबत विद्वेष असणे विकृती आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून टीकेचे आसूड ओढले.

मनसे पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन, गंगा नदीची स्वच्छता, कुंभमेळा, औरंगजेबाची कबर आणि अशा विविध विषयांवरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर खरपूस शब्दांत टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांना माझे आवाहन आहे की, तुमच्या हाती चांगले राज्य आलेले आहे. मराठी माणसाचे हित पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोजगार यांचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. टोरस कंपनी इथे आली लुटून गेली. जी असुरक्षितता आली आहे, वैचारिक असुरक्षितता आली आहे, या शब्दांत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

मधल्या मधे अदानींना जमीन मिळून जाते

मूळात विषय वेगळे असतात आणि नको ते विषय काढून तुम्हाला भरकटवले जाते, वेगळीकडे नेले जाते. आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटोपून घेतात. मधल्या मधे अदानींना जमीन मिळून जाते. मुंबईचे विमानतळ दिले अदानींना, नवी मुंबईचे विमानतळ दिले अदानींना, पालघरचे दिले अदानींना, बंदर दिले अदानीला, अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. कित्येक गोष्टी आहेत, ज्या विधानसभेत बोलल्या जाऊ नयेत, लाडकी बहीण योजनेचे काय झाले? काही नाही. बंद होणार ती योजना. निवडणुकीच्या वेळेस सांगत होतो; पण, माझे खरे सांगून तुम्हाला पटले नाही. यांचे खोटे सांगून पटले, कमाल आहे. महत्त्वाचे जे विषय आहेत, त्या महत्त्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचे आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचे? विधानसभेत चर्चा कशावर, तर औरंगजेबावर, असे सांगत राज ठाकरेंनी निशाणा साधला.

दरम्यान, रोजगाराचे विषय, कामगारांचे विषय, शेतकऱ्यांचे विषय हे सगळे विषय बाजूला टाकत आहोत. संतोष देशमुख यांना किती घाणेरड्या पद्धतीने मारले. तुमच्या नसानसांत इतकी क्रूरता असेल तर मी जागा दाखवेन. हे सगळे झाले कशातून विंड मिल, तिथली राख. मी आजवर ऐकले होते राखेतून फिनिक्स भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतो. संतोष देशमुखांनी या सगळ्याला विरोध केला. कारण विषय होता खंडणीचा. खंडणींचा विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावले की, वंजाऱ्याने मराठ्याला मारले. यात जातींचा काय संबंध? राजकीय पक्ष तुम्हाला सातत्याने जातीपातीत गुंतवत आहेत. शेतकऱ्यांच्या दिवसाला सात आत्महत्या होत आहेत, रोजगार निर्मिती होत नाहीत, मराठवाडा सोडून तरुण-तरुणी पुण्यात येतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हे सगळे चालले आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 31-03-2025