नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून कायम करण्यात येतो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देत आहे. 10 कोटी लोकांना भाजपाशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले असताना आता पुढच्या आठवड्यात भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
भाजप स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. जेपी नड्डांनंतर (J.P. Nadda) भाजपच्या मोठ्या 4 नेत्यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असल्याचं कळतंय. (BJP new President)
जेपी नड्डांनंतर कोणाची नावं चर्चेत?
भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. जून 2019 मध्ये जे. पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले हेाते. दरम्यान, आता लोकसभा निवडणूका आणि विधानसभा निवडणुकांनंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपसाठी सोपे नसले तरी काही नावांबाबत विचार केला जात आहे. मात्र, यातील अनेकजण महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
संघाच्या पसंतीच्या चेहऱ्यांपैकी असेल राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष संघाच्या सहमतीने निवडणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीचा चेहराच असेल की नाही याबद्दल शंका आहेत. राजकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात लोकसभेत पत्करावी लागणारी हार तसेच इतर मोठ्या राज्यांमधला मतांमधला फरक लक्षात घेता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा संघाच्या पसंतीचा असण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 31-03-2025
