राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह : मंत्री आदिती तटकरे

मुंबई : चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.

या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून, जन सुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 31-03-2025