LPG Price: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची कपात; तर घरगुती सिलिंडरची किंमत काय?

Gas Prices : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दरवर्षी तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमतीत बदल करत असतात. त्याच अनुषंगाने ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे.

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आता 41 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आज म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू असणार आहे. या नवीन कपातीनंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1714.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1755.50 रुपये इतकी होती. परिणामी या नव्या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे.

सिलिंडरच्या दरातील कपातीनंतरचे दर काय?

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1762 रुपये झाली असून ती 41 रुपयांनी कमी झाली आहे. तर कोलकातामध्ये 44 रुपये 50 पैशांनी कमी झाल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1868 रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 42 रुपयांनी कपात करण्यात आली असून, ती आता 1713 रुपये 50 पैसे झाली आहे. त्यामुळे चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर 43 रुपये 50 पैशांच्या कपातीनंतर सिलिंडरची नवीन किंमत 1921 रुपये 50 पैसे झाली आहे. जर आपण घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल बोललो तर सध्या ते दिल्लीमध्ये 803 रुपये, मुंबईमध्ये 802 रुपये 50 पैसे, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818 रुपये 50 पैसे उपलब्ध आहे. 9 मार्च 2024 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची कपात करण्यात आली असताना, घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14. 2 किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कापत केलेली नाही. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802. 50 रुपये तर चेन्नईमध्ये 818. 50 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसांमन्य जनतेला याचा कोणताही दिलासा अद्याप तरी होणार नाहीये. त्यामुळे आता चाकरमान्यांची काहीशी निराशा झाली असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 01-04-2025