पावस बसस्थानकात दुर्गंधीचा त्रास

पावस : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पावस बस स्थानक परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या साठवण टाकीचे काम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिवहन विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे.

पावस बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी शौचालय व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पावस ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजारांचा निधीतून शौचालय बांधण्यात आले; परंतु त्या शौचालयासाठी साठवण टाकीचे काम करताना ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही साठवण टाकी सातत्याने भरून त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर वाहू लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते.

या परिसरामध्ये हॉटेल, दुकाने व सार्वजनिक विहिरी या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शौचालयाचे काम करण्यात आले आणि ते परिवहन खात्याकडे वर्ग करण्यात आले; परंतु साठवण टाकीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संबंधित खात्याला प्रत्येक वेळी साठवण टाकी साफ करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागतात. ही गोष्ट संबंधित खात्याला परवडत नाही. या संदर्भात विभागीय अधिकारी यांनी येथील परिस्थिती जाणून घेतली; परंतु त्यानंतर त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

यासंदर्भात प्रवासी सागर पावसकर म्हणाले, प्रवासी जनतेच्या मागणीनुसार सुसज्ज पावस बसस्थानकाची इमारत सुलभ शौचालय बांधण्यात आली आहे. त्यामुळे पावस येथे येणाऱ्या भाविकांना व प्रवाशांना दिलासा मिळाला; परंतु साठवण टाकीचे काम योग्य न झाल्यामुळे शौचालय वारंवार तुंबते. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी प्रवासी जनतेच्या सोयीसाठी परिवहन विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 01/Apr/2025