इम्रान खान यांचे नाव शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट

नोबेल पुरस्कार हा शांततेचा पुरस्कार करणाऱ्या जगभरातील व्यक्तींसाठी दिला जातो. हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे. परंतू, पाकिस्तानचा पदच्युत पंतप्रधान आणि तुरुंगाची हवा खात असलेला क्रिकेटर इम्रान खानचे नाव यासाठी सुचविण्यात आले आहे.

पाकिस्तानी वर्ल्ड अलायन्स आणि नॉर्वेजिअन राजकीय पार्टी सेंट्रमने याची माहिती दिली आहे.

इम्रान खान याची पत्नी बुशरा बीबी ही काळी जादू करण्यात एक्सपर्ट असल्याचा दावा करण्यात येत होता. तिच्याबाबतच्या बातम्या इम्रान खानला कारावास झाला तेव्हाच समोर आल्या होत्या. तसेच पाकिस्तानी पंतप्रधानांना मिळणारी मौल्यवान गिफ्ट इम्रान खानने विकून पैसे कमविल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. याचबरोबर अनेक आरोपांखाली इम्रान खान याला तुरुंगात पाठविण्यात आले आहे. याच आरोपांवरून सत्तेत असतानाही त्याच्यावर खटला सुरु होता, तसेच त्याला १४ वर्षांची शिक्षाही झाली आहे.

इम्रान खान याला तुरुंगात धाडल्याने त्याच्या समर्थकांनी पाकिस्तानात हिंसाचारही केला होता. इम्रानने पंतप्रधान होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर भारताविरोधात युद्धाची भाषा केली होती. अशा या शांतताप्रेमी इम्रान खानला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्थापन झालेल्या पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) च्या सदस्यांनी इम्रान खान याच्या नावाची घोषणा केली आहे. हे लोक नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टी सेंट्रमचे सदस्य आहेत. पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या कामासाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आल्याचे या पक्षाने म्हटले आहे.

इम्रान खानला नोबेलसाठी नामांकन देणे ही काही पहिलीच वेळ नाहीय. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी इम्रान खान याला २०१९ मध्येही नामांकन देण्यात आले होते. दरवर्षी नॉर्वेजियन नोबेल समितीला शेकडो नामांकने मिळतात, त्यानंतर ते आठ महिन्यांच्या प्रक्रियेद्वारे विजेत्याची निवड केली जाते. आता नॉर्वेतील एका पक्षाने इम्रानचे नाव सुचविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 01-04-2025