रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील भांबेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
रुग्णालयात जशी सकाळची ओपीडी सुरू असते, तशीच ४ ते ६ या दुपारच्या सत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी सुरू ठेवावी, जेणेकरुन महिला भगिनींसाठी आरोग्याची सोय उपलब्ध होईल, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, ६ कोटी २२ लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होणार आहे. एका वर्षामध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. लोकप्रतिनिधींची मानसिकता असेल, तर कायापालट कसा होऊ शकतो, हे पाहू शकता. भांबेडसारख्या ठिकाणी पीएचसी होण्यासाठी इतकी वर्षे का लागली याचा विचार व्हायला हवा. दोन्ही महामार्गांचे मध्य ठिकाण असणाऱ्या भांबेड पीएचसीला प्राधान्य दिले आहे. इथल्या ग्रामस्थांना सर्व सुविधा आणि आरोग्यासाठी चांगली सोय असेल. डॉक्टारांनीदेखील २४ तास सेवा दिली पाहिजे. राज्यातील चांगली इमारत म्हणून या पीएचसीची इमारता बनवावी. जैतापूरलाही दुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येत आहे. धरणांच्या कामालाही पैसे मिळाले आहेत. या पीएचसीच्या माध्यमातून नागरी सुविधेची चांगली सोय झाली असली, तरी ग्रामस्थांना डॉक्टरांकडे वारंवार जायची वेळ येऊ नये. त्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
याप्रसंगी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सरपंच विनीता गांगण, तहसीलदार प्रियांका ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत परगे, वैद्यकीय अधिकारी उमा त्रिभुवने, राहुल पंडीत, गुरुप्रसाद देसाई, राजू कुरूप, वकील सदानंद गांगण आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 07-10-2024














