रत्नागिरी : जागतिक स्वमग्नता ऑटिझम जागरुकता दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (३ एप्रिल) रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी विभागात ऑटिझमची लक्षणे असणाऱ्या बालकांची तपासणी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरबीएसके – डीईआयसी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीमधून संदर्भित केलेल्या मुलांना डिईआयसी विभागातील विशेष तज्ञांमार्फत पुढील उपचार व संदर्भसेवा दिली जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा गरजू लोकांपर्यंत पोहचवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामध्ये स्वतःत मग्न राहणे, इतरांशी संवाद साधू न शकणे, एका जागी स्थिर बसू न शकणे, नजरेला नजर देवून न बोलणे, हात हलवत राहणे इ. सारखी लक्षणे असणाऱ्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती असे लक्षात आल्यास या मुलांना ऑटिझम (Autism) आहे तर त्यांना UDID कार्ड वितरीत करण्यात येईल. ऑटिझम (Autism) असलेल्या मुलांसाठी कोणत्या प्रकारची थेरपी व उपचार देण्याची गरज आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ऑटिझम असल्यास मुलांसाठी निरामय आरोग्य विमा याबाबतची माहिती पालकांना देण्यात येईल.
अशी लक्षणे असलेल्या मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच येताना सोबत मुलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो व पूर्वीच्या तपासणी चे रिपोर्ट्स आणावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संचालक श्रीमती सुरेखा पाथरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील आरबीएसके वैद्यकिय पथकांशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 01/Apr/2025
