“लोकशाही पद्धतीने कलाकाराला कसं संपवावं” कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत

Kunal Kamra Targets Government Amid Joke Row: कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील एका शोमध्ये “गद्दार नजर वो आए…” या विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर टिप्पणी केली.

यानंतर कुणाल कामरा वादात सापडला आहे. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर कुणाल सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त होतोय. अशातच त्यानं नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून “लोकशाही पद्धतीने कलाकाराला कसं संपवावं” याची स्टेप-बाय स्टेप प्रोसेस सांगत सरकारवर हल्लाबोल केलाय.

कुणाल कामरानं सांगितली स्टेप-बाय स्टेप प्रोसेस….

स्टेप 1: आउटरेज… एवढा करावा की समाजातून होणारा विरोध पाहून ब्रॅण्ड्स त्या कलाकारासोबत काम करणं कमी करतील.

स्टेप 2: विरोध वाढवावा, जेणेकरून प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट गिग्स मिळणे कठीण होईल.

स्टेप 3 :आवाज अधिक चढवावा, म्हणजेच मोठी ठिकाणं धोका पत्कारणार नाहीत, परिणामी तिथे काम करण्याची संधी नाहीशी होईल.

स्टेप 4 : हिंसक विरोध करावा, ज्यामुळे अगदी लहान ठिकाणचेदेखील दरवाजे बंद होतील.

स्टेप 5 : प्रेक्षकांना नोटिसा पाठवा, चौकशी करा, जेणेकरुन कला ही एक गुन्हा ठरवली जाईल.

मग असं केल्यानं कलाकारासमोर फक्त दोनच पर्याय उरतात. एक तर स्वतःचा आत्मा विकून कठपुतळी बनणं किंवा गप्प राहणं. कलाकाराला शांत ठेवण्यासाठीचं हे एक राजकीय शस्त्र आहे. हे एक सायलेन्सिंग मशीनसारखं काम करतं, असं कुणाल कामरानं पोस्टच्या शेवटी लिहिलं

कुणालचीही पोस्ट चर्चेत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलंय. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराला मद्रास न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

समन्स बजावल्यानंतरही कुणाल कामरा अद्यापही पोलिसांसमोर हजर झालेला नाही. त्यामुळे सोमवारी खार पोलीस मुंबईतील येथील कुणाल कामरा याच्या घरी दाखल झाले होते. यावेळी तिथे त्याचे आई वडील उपस्थित असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी कुणाल कामराच्या आई वडिलांकडे त्याच्या बाबत प्राथमिक चौकशी केली. यानंतर कुणाल कामराने इन्स्टाग्राम पोस्टमधून मुंबई पोलिसांवर भाष्य केलं. “अशा पत्त्यावर जाणे जिथे मी गेल्या १० वर्षांपासून राहत नाही तो तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे,” अशा कॅप्शनसह कुणाल कामराने त्याचा तामिळनाडूतील घरामधील एक फोटो शेअर केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 01-04-2025