चिपळूण : आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चिपळूण नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व नियोजन व तयारीकरिता बुधवारी (दि. २) सकाळी ११ वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गतवर्षी केलेल्या तयारीचा व मान्सून काळातील आपत्ती संदर्भातील अनुभवावरून नव्याने कोणते नियोजन व आराखडा करावा, त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या वतीने उद्या सकाळी ११ वा. आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये मान्सून पूर्व तयारी व नियोजनासाठी बैठक होत आहे. या बैठकीला शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
दरम्यान, गतवर्षी देखील अशाप्रकारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी नागरिक, व्यापाऱ्यांनी केलेल्या सूचना, दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने बैठकीत नोंदी घेऊन त्या बाबत तातडीने कार्यवाही केली होती. परंतु गतवर्षी कालावधी कमी मिळाल्याने काही प्रमाणात त्रुटी राहिल्या होत्या. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी यावर्षी ही बैठक दोन महिने आधीच घेण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने मान्सून पूर्व नियोजन व तयारीचे काम हाती घेतले आहे.
त्यानुसार शासनाकडून मिळालेल्या यांत्रिकी बोटींसह साध्या बोटी, लाईफ जॅकेटस्, दोरखंड, बोये, जेसीबी, पोकलेन, डम्पर व सायरनची सुविधा आदी तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्या तोडणे, धोकादायक इमारतींना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले आहे.
या सर्व तयारीबाबत शहरातील व्यापारी व नागरिकांना माहिती देणे तसेच अन्य सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा परिपूर्ण तयारीकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नागरिक व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 02/Apr/2025














