प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे : न्यायमूर्ती माधव जामदार

रत्नागिरी : न्याय व्यवस्था आणि प्रशासन यांनी प्रगती केलेल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हे पद मिळाले. हा जिल्हा विचारवंतांचा, बुद्धिवंतांचा, त्याग करणा-यांचा आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, ही न्यायाची व्यापक संकल्पना आहे. भारतीय राज्य घटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते सर्वच नागरिकांना मिळाले पाहिजेत. सामाजिक न्याय तत्त्वांचा अंगीकार केलेला आहे. संविधानात अपेक्षित असणारा न्याय राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समान संधी मिळण्याचा असा सर्वसमावेशक आहे. नागरिकांना जगण्याचा अधिकार आहेच, पण घटनेने तो अधोरेखित केलेला आहे. जीबन प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत नागरिकाला लाभ पोहोचवायचा असेल तर, कल्याणकारी योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठीच विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला लाभार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद, त्यांना देण्यात आलेला लाभ हे पाहून समाधान आणि आनंद देणारा हा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.

दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात विधी सेवा महाशिबिराचे फीत कापून न्यायमूर्ती जामदार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिल्याची पुस्तिका जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी न्यायमूर्ती जामदार यांना सुपूर्द केली. इतक्या मोठ्या संख्येने जिल्हा प्रशासनाने जनतेला लाभ दिल्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश सुनील गोसावी, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील विजयसिंह पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते. उ‌द्घाटनानंतर न्यायमूर्ती जामदार यांनी विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोसावी म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन शहरात दीडशे तर जिल्ह्यात तीनशे पन्नास कार्यक्रम घेतले. नागरिकांची जनजागृती करणे, नागरिकांना विविध विषयांतील हक्क, गुन्ह्यांबाबत शिक्षेची माहिती देणे, न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या कमी करणे हा हेतू या कार्यक्रमामागील होता, या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, या महाशिबिराची युद्धपातळीवर तयारी केली, विविध ४४ विभागांमार्फत ३१ स्टॉल उभारून १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ दिला जातोय. यापुढेही लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच ४ लाख १३ हजार महिलांना लाभ देत आहोत. शासन आपल्या दारी हा उद्देश प्रशासनामार्फत पूर्ण करतोय. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 07/Oct/2024