उबाठा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदासाठी तरुण चेहऱ्याचे नाव ?

चिपळूण : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर नव्या जिल्हाप्रमुखाच्या निवडीसाठी उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. ३१) चिपळूणमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हाप्रमुखपदासाठी तरुण चेहऱ्याचे नाव पुढे आले आहे. पदाधिकाऱ्यांचेही त्यावर एक मत झाले असून, मातोश्रीवरून अंतिम घोषणा होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मोहीम राबवल्यानंतर प्रथम तत्कालीन जिल्हाप्रमुख सचिन कदम, गुहागर विधानसभा मतदार संघाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांच्यासह अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची साथ सोडली. तत्पूर्वी विधानसभेच्या निकालानंतर संघटनेमध्ये बदल करून संजय कदम यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. संदीप सावंत यांच्याऐवजी जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण यांची गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी संजय कदम यांनीही जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाची निवड करावी, यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत. सोमवारी चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील ठाकरे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये चिपळूणमध्ये झाली.

जिल्हाप्रमुख निवडताना प्रामुख्याने उत्तर रत्नागिरी भागातील स्थानिक आणि आक्रमक नेत्याची निवड करावी, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाप्रमुख हा दापोली खेड तालुक्यातील असावा, असे काहींचे म्हणणे आले, तर काहींनी चिपळूण किंवा गुहागरमधील पदाधिकाऱ्यांची निवड झाली, तरी चालेल; परंतु चेहरा आक्रमक आणि नव्या दमाचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाप्रमुख निवडण्याचे सर्व अधिकार आमदार भास्कर जाधव यांना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिले.

उत्तर रत्नागिरीतील जिल्हाप्रमुख पदासाठी आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हाप्रमुख निवडण्याचे सर्व अधिकार आम्ही आमदार जाधव यांना दिले आहेत. ते निवडतील तोच अध्यक्ष होईल – जितेंद्र चव्हाण, तालुकाप्रमुख, गुहागर

अहवाल पक्षश्रेष्ठींकडे
शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार जाधव यांनी पुन्हा मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्या नव्या दमाच्या तरुण पदाधिकाऱ्यांच्या नावावर एकमत झाले आहे; मात्र हे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आमदार जाधव या संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना देतील. त्यानंतर नव्या जिल्हाप्रमुखाची निवड होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 02/Apr/2025