चिपळूणच्या वीजपुरवठ्यात रात्रभर व्यत्यय..

चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पातून महावितरणला वीजपुरवठा करणारे रोहित्र (डीपी) सोमवारी (ता. ३१ मार्च) झालेल्या पावसात फुटल्यामुळे चिपळूण तालुक्यातील ग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सोमवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. रात्री दहाच्यादरम्यान विजा चमकल्या, ढगांचा गडगडाटही झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. यापूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत वीज येत होती; मात्र सोमवारी रात्री विजेसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागली, पंखे आणि एसी लावून झोपण्याची सवय झालेल्या ग्राहकांना रात्री उकाडाने हैराण केले.

कोयना जलविद्युत प्रकल्पातून महावितरण कंपनीला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये पहिल्याच पावसाळ्यात बिघाड झाला. त्यामुळे चिपळूणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यानी रात्री पर्यायी व्यवस्था करताना दुसऱ्या वाहिनीवर लोड देण्याचा प्रयत्न केला तेव्हा वीजपुरवठा सुरू झाला परंतु कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे काहीवेळाने तो पुन्हा बंद करण्यात आला, मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. सकाळी दहानंतर तो सुरू झाला. मात्र सायंकाळपर्यंत अधूनमधून वीज ये-जा करत होती. दरम्यान, ३१ मार्च वर्षअखेरीचे बँका, शासकीय कार्यालयात सुरू होते. मात्र, वीज गायब झाल्याने रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.

जलविद्युत प्रकल्पातून महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रामधील इन्सुलेटर चिनी मातीचे असतात. उन्हाळ्यात ते गरम होतात. मोसमी पावसात पाणी पडल्यानंतर त्यांचा स्फोट होतो. ही समस्या दरवर्षीची आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले- अनित गेडाम, कार्यकारी अभियंता, महावितरण चिपळूण

शनिवारपर्यंत पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (ता.५) पर्यंत तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, सोसाट्याचा वाऱ्यासह विजेच्या लखलखकाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३६ डीग्री सेल्सीअस एवढे राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच किमान तापमान २३.१ डीग्री सेल्सीअस राहील. वेगवान वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे तयार झालेले आंबा फळे गळून नुकसान होईल. रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 02/Apr/2025