साडवली येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्रासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आक्रमक

रत्नागिरी : देवरुख साडवली येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चालू करून लोहारकाम करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम मिळण्याकरिता जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा उद्योग कार्यालयात जाऊन महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांना धारेवर धरले. २४ तासांत उद्योग सुरू करण्यासाठी तोडगा काढा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला. जयस्तंभ येथे २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसलेल्या कमलाकर मसूरकर यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष सावंत यांनी आश्वस्त केले.

साडवली, देवरूख येथील विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चार वर्षे ठप्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्राच्या अध्यक्षांनी उपोषण सुरू केले. परंतु, ज्या उद्योग विभागाने पैसे दिले, मशिनरी दिली त्यांनी पुन्हा उद्योग करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. चार वर्षात उद्योगच सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे दुःख जाणून घेत भाजपा जिल्हाध्यक्षांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतले. जनरेटवर मशिनरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करा, आजारी उद्योग म्हणून काही करता येते का, वीज बिल माफीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या. उद्योगमंत्री रत्नागिरीच असूनही त्यांच्याकडे प्रस्तावच न पाठवल्याने नाराजी व्यक्त केली. भाजपा सरकारला बदनाम करू नका, कारागिरांवर उपासमारीची वेळ आणू नका, असेही सावंत यांनी ठामपणे सांगितले.

चार वर्षांत उत्पन्नच नाही
राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे आहेत. त्यांच्या उद्योग विभागाने दखल न घेतल्याने केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी २ ऑक्टोबरला उपोषण सुरू केले. देवरुख येथेही उपोषण करण्यात आले होते. उद्योगच सुरू झाला नाही आणि मशिनरीचा पार्ट गेला, लोहारकाम करणाऱ्या कारागिरांनी सव्वा कोटी पदरचे दिले. मात्र, चार वर्षांत त्यांना उत्पन्नच मिळाले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 07/Oct/2024