रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमध्ये कंत्राटीपध्दतीवर काम करणाऱ्या व विविध ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात असणाऱ्या ४०० पैकी १०० कामगारांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला असून ही कामेही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न.प.च्या विविध विभागांचा आढावा ना. सामंत यांनी घेतला. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर व अन्य अधिकारी उपस्थित होते. नगर पालिकेत सध्या ४०० कामगार कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहेत. नुकताच नगर पालिकेने या कामगारांबाबत आढावा घेतला असता, त्यात १०० कामगार अतिरिक्त ठरले आहेत. कंत्राटी कामगारांवर मोठा खर्च होत असल्याने, १०० कामगार कमी करण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतला आहे.
नगर परिषदेप्रमाणेच क्रीडा विभागाचीही बैठक ना. सामंत यांनी आयोजित केली होती. क्रीडा संकुलाच्या कामासाठी ६.५ कोटी रुपये मंजुरीचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुका क्रीडा संकुलासाठीही पाच कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुलाजवळ मल्टीपर्पज हॉलचे काम पूर्णत्वाला आले आहे. या ठिकाणी कबड्डी, खो-खो, बँटमिंटन, अंडरआर्म क्रिकेट आदी खेळ खेळता येणार आहेत. सिंथेटिक ट्रॅकसाठी तीन कोटी रुपये देण्यात आले असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. शहरातील स्विमींग पूल शेअरींग पध्दतीने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा संकुलातील भाड्याने दिलेल्या क्रीडा संस्थांचे भाडे वाढ़ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल. डी. वाय. पाटील स्टेडियमप्रमाणे रात्रीच्या स्पर्धा घेता याव्यात यासाठी विद्युत दिवे बसविले जाणार आहेत.
रेशनकार्डसाठी गावनिहाय शिबिर
रेशनकार्डबाबत ग्रामीण भागातून अनेक तक्रारी येत असून, या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेशनकार्डबाबत गावनिहाय शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. रेशनकार्डची अनेक प्रकरणे चार-पाच महिने प्रलंबित असल्याची माहितीही नागरिकांकडून मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावनिहाय शिबिरांबाबत लवकरच कार्यक्रम ठरवला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 03/Apr/2025














