मुंबई : “काँग्रसेचा दबाव नाही. भाजपचा दबाव नाही. जे वाटतं, पटतं ते करतो. मी अंधभक्त नाही. भाजपची पावलं ज्या पद्धतीने पडत आहेत, तुम्हाला वक्फमध्ये सुधारणा करायच्यात त्या करा. पण आमच्या मंदिरांवरही उद्या याल.
तुम्ही हिंदूंचे राखणदार नाही का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. “आम्हाला पटलं नाही ते आम्ही मांडलं होतं. नोटबंदीवर आम्ही बोललो होतो. मोदींचं सरकार आल्यावर लोकलची दरवाढ केली. त्याला आम्ही विरोध केला होता” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता. कारण आम्ही अशा भूमिका घेत आलो आहोत. गरीब मुस्लिमांचं यात काय हित होणार आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलंय का ते सांगा” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आमचा ढोंग आणि नौटंकीला विरोध आहे. बिलामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. आमच्या सूचना घेतल्या असत्या तर चांगलं झालं असतं. सबका साथ आहे ना. मग सर्वांना सोबत का घेतलं नाही?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
होळीला पुरणपोळी वाटली का?
“आता महापालिकेच्या निवडणुका एवढ्यात होतील असं वाटत नाही. यावेळी भाजपने मुस्लिमांची बाजू घेतली आहे. जिनांना लाजवेल अशी भाषणे केली आहेत. त्यामुळे हिंदूंनी आता जागं व्हावं, राम नवमी, होळी आणि हनुमान जयंतीला काही वाटलं का? होळीला पुरणपोळी वाटली का? यांना फक्त गरजेपुरते लोक हवे असतात” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हिंदू जागा झाला आहे
“आमची भूमिका स्वच्छ आहे. या बिलाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. अमित शाह, किरन रिजिजू यांनी मुसलमानांचं लांगूलचालन केलं आहे. त्यामुळे हिंदूंचे डोळे उघडले आहेत. हे आपला वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. हिंदू जागा झाला आहे. त्यामुळे उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार आहे” अशी टीका उद्धव यांनी केली.
भाजपला धन्यवाद देईन, त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला
“भाजपला धन्यवाद देईन. त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला. त्यामुळे भाजपचं खरं रूप समोर आलं आहे. हिंदूंचे डोळे उघडले आहेत. जेडीयू आणि टीडीपीने सांगितलं, आम्ही मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात कुणालाही जाऊ देणार नाही. त्यावर अमित शाह पासून कुणाचीही बोलयाची हिंमत झाली नाही. आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हे सांगण्याची हिंमत त्यांची झाली नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 03-04-2025
