मुंबई : देशात अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या वक्फ बोर्ड (Waqf board) विधेयकाला अखेर बुधवार 2 मार्च रोजी ससंदेत मुहूर्त मिळाला. संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या घमासान चर्चेनंतर रात्री उशिरा हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.
विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. त्यामुळे वक्फ विधेयकात मोदी सरकारला मोठं यश मिळालं आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना युबीटी पक्षाने या विधेयकाविरोधात मतदान केल्याने पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. भाजपने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना व ठाकरेंवर जोरदार टीका केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपचाच खरा चेहरा उघडा पडल्याची टीकाही केली आहे.
केंद्र सरकारकडून संसदेत मांडण्यात आलेल्या वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नसल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. तसेच, वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, वक्फ सुधारणा विधेयकामागे धार्मिक हेतू आहे का?, असा सवाल खासादर अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तर, वक्फ विधेयकाविरोधात शिवसेनेनं मतदान केल्याचं पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
1. आज 3 एप्रिल आहे, आपल्या सगळ्यांना आठवत असेल 15-30 दिवसांआधी अमेरिकेने सांगितलं की, तुम्ही कर कमी करा नाहीतर आम्ही कर वाढवू. कर वाढवले आहेत. आता बाजार कोसळला आहे, आर्थिक संकट असताना, काय पाऊले उचल्याची गरज आहे, ही भूमिका सरकाराने घेतली पाहिजे होती. हे देशासमोर येणारं आर्थिक संकट पंतप्रधान मोदींनी सांगायला हवं होतं. त्यावर काय करायचे असं ते म्हणाले असते तर आम्ही एकमुखाने सोबत राहिलो असतो. आज तरी लोकसभेत, राज्यसभेत आर्थिक संकटाबद्दल अर्थमंत्र्यांनी तरी अवगत केलं पाहिजे, आज हे करणं गरजेचं आहे, असे उद्धव ठाकरेंन म्हटले.
2. नुकतीच इद झाली आहे, या सगळ्यांनी इदच्या मेजवान्या झोडल्या आणि वक्फ बोर्ड बिल मांडलं. मंत्री रिजिजूंनी बिल मांडलं, किरेन रिजिजू यांनी एकेकाळी गोमांसाचं समर्थन केलं होतं. मशिदीत घुसून मारणार म्हणतात, थांबा सांगतात, सौगाते मोदी घेऊन जा म्हणतात… असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.
3. वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत, त्याचं स्वागत. मात्र, त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे आहेत. 370 हटवला तेव्हा आम्ही पाठींबा दिला होता, कश्मिरी पंडितांना त्यांच्या जमिनी किती परत दिल्या सांगा, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
4. चीन पेंगॉन्ग येथील 40 हजार स्केअर फुट जमिनीवर चीनचा ताबा त्यावर हे लोक बोलत नाही. जिन्हांनांही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषणं संसदेत केली. वक्फच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे, वक्फ बोर्डाची जागा बुलेट ट्रेनला दिली, असेही ठाकरेंनी म्हटले
5. हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही? आम्ही काय करायचं ते तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर योग्य नाही. तुमच्या आजुबाजुला मुसलमानांची भलामण झाली तेव्हा गद्दार का बोलले नाहीत, असा सवाल ठाकरेंनी विचारला. मोदी सरकार आलं असतं तर संसदेचची जागा वक्फ बोर्डाला हडपायची होती. हे रिजीजू बोलले होते, याची आठवणही ठाकरेंनी करुन दिली.
6. शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलामान देशद्रोही आहेत असं कधी म्हंटलं नाही. मी भाजपला आव्हान करतो, हिंदू हिंदू करत असाल तर झेंड्यावरील हिरवा रंग काढा. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालणार की जिना यांच्या, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
7. आमच्यावर काँग्रेसचा दबाव आहे, भाजपचा दबाव आहे असं काही नाही. जे मला पटतं ते मी करतो.आज वक्फ बोर्डावर नियंत्रण आणताय ठीक आहे, त्याचं स्वागत पण ज्या पद्धत्तीने भाजपचं पाऊल पडतायत. उद्या तुम्ही हिंदूंवर पण आणाल. आधीच देवस्थानांची जागा हडपली गेली आहे. हिंदुत्वाचे राखणदार आहात तर मुसलमानांची इतकी बाजू का घेतायत. हिंदूंमध्ये गरीब नाही का, मुस्लीम गरिबांना काय फायदा होणार आहे, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.
8. मोदींचं सरकार आल्या आल्या लोकलची दरवाढ केली, तेव्हा त्याचा विरोध केला होता. नोटबंदीच्या वेळी पण मी बोललो होतो.
9. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढ्यात होतील असं वाटत नाही.
10. तुम्ही मुसलमानांचे लांगुन चालन करत असताना आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही?. मी भाजपचे आभार मानेन. वक्फ बोर्डाचा विषय घेतला, त्यामुळे भाजपचं खरं रुप काय हे कळालं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 03-04-2025
