Uddhav Thackeray vs BJP, Waqf Board Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तसेच राज्यसभेतही विधेयक पारित करायला एनडीएला फार अवघड जाणार नाही.
या विधेयकावरून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध आहे. ठाकरेंच्या या प्रतिक्रियेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहेत.
“उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले. संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे,” असे ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसं सहन करतील. वक्फ बोर्डात काही अफरातफर सुरू असेल तर नक्कीच त्यावर पायबंद घातला पाहिजे. देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू मुस्लीम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते, तेव्हा तुम्ही का गप्प बसला?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 03-04-2025
