रत्नागिरी : विशेष साहाय्य कक्षात कौटुंबिक हिंसाचाराची ८५ टक्के प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात यश

रत्नागिरी : पीडब्ल्यूडीव्ही अॅक्ट २००५ च्या कलम १० मधील तरतुदीनुसार कष्टकरी रयत सेवा संस्था संचलित महिला व मुलांकरीता असलेल्या विशेष साहाय्य कक्षाची सन २०१० मध्ये स्थापना करण्यात आली. मागील १४ वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराची १९८५ व इतर २१५ प्रकरणे नोंदवली गेली, त्यातील जवळपास ८५ टक्के प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.

महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पोलिस अधीक्षकांच्या संनियंत्रणाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात हे महिला कक्ष स्थापन करण्यात आले. २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत तेथे जवळपास २००० प्रकरणे नोंद केली गेली आहेत. यात शारीरिक, मानसिक, लैंगिक, शाब्दिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे अशाप्रकारच्या अत्याचार पीडित महिला व १८ वर्षांखालील मुलांना सेवा आधारगृह सेवा कौटुंबिक समुपदेशन न्यायालयीन सेवा, आरोग्य, पोलिस मदत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध, पोक्सो कायदेविषयक सेवा इ. विनामूल्य पुरविल्या जातात.

महाराष्ट्र शासनाच्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार पीडित महिलेला पुढील कार्यवाहीसाठी स्वतः निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क असून, कोणत्याही प्रकारचे एकत्र समुपदेशन तिच्या अनुमतीनंतरच करण्यात येते. भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था रत्नागिरीचे समुपदेशक पवनकुमार मोरे आणि छाया कोकरे यांनी या कुटुंबांना मार्गदर्शन केले आहे. यासाठी महत्त्वाची भूमिका जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संनियंत्रणाखाली राबवण्यात आली.

कक्षातर्फे १८० जनजागृती कार्यक्रम
या कक्षाद्वारे पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाची मदत मिळवून देण्याकरीता जवळपास ७० प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवली. तसेच ११० पीडित महिलांची सखी वन स्टॉप सेंटर येथे तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. जवळपास १८० जनजागृती कार्यक्रम राबवून शाळा, महविद्यालये ग्रामसभा, महिला बचत गट व इतर शासकीय यंत्रणांमधील महिला, पुरुष व मुलांना कक्षाची व महिला आणि मुलांविषयक कायद्यांची माहिती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:00 PM 07/Oct/2024