Sagar Karande: सागर कारंडेला ६१ लाखांचा गंडा!

‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सायबर क्राइमचा शिकार झाला आहे. सागर कारंडेला चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातला आहे. मोहाला बळी पडल्याने सागर कारंडेची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणुक झाली आहे.

याप्रकरणी अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली असून सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सागर कारंडेला फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करा आणि पैसे कमवा असा आशयाचा मेसेज व्हॉट्स अॅपवर आला होता. एक इन्स्टा पोस्ट लाइक करण्याचे त्याला १५० रुपये मिळणार होते. घरबसल्या काम असल्याने या मोहाला ४५ वर्षीय सागर कारंडे बळी पडला आणि ६१ लाख रुपये गमावले. एका अनोळखी व्हॉट्सअॅप वरुन एका महिलेने सागरला संपर्क केला होता. टेलिग्राम आणि इतर समाजमाध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंक लाइक करायच्या आहेत, असं त्याला सांगण्यात आलं होतं.

आधी २७ लाख अन् नंतर १९ लाख भरले

या कामासाठी सागरला सुरुवातीला काही पैसे भरावे लागणार होते. ते पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. यावर विश्वास ठेवून सागरने सुरुवातीला २७ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला सागरला ११ हजारांचे कामही देण्यात आले होते. काही दिवसांनंतर सागरने वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असंही त्याला सांगितलं गेलं होतं. त्याबरोबरच १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत सागरला सायबर गुन्हेगारांनी आणखी १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पडलं. अशा प्रकारे अभिनेत्याकडून ६१ लाख रुपये उकळण्यात आले.

सागरच्या लक्षात आला फसवणुकीचा प्रकार

एवढे पैसे गुंतवल्यानंतरही कर चुकीच्या खात्यात जमा झाल्याचं सांगत सागरला आणखी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आलं. पैसे मिळत नसल्याने आपल्याला फसवलं गेल्याचं सागरच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 04-04-2025